Adani Enterprises : अमेरिकन सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशनचे प्रकरण ताजे असतानाच, उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्राइजेजबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. जून २०२५ मध्ये 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने केलेल्या गंभीर आरोपांनंतर, अदानी समूह आता अमेरिकेच्या 'ऑफिस ऑफ फॉरेन असेट्स'सोबत चर्चा करत असल्याची अधिकृत माहिती कंपनीने दिली आहे. या वृत्ताचा थेट परिणाम आज शेअर बाजारात दिसून आला असून अदानींच्या कंपन्यांचे समभाग चांगलेच कोसळले आहेत.
काय आहे 'वॉल स्ट्रीट जर्नल'चा अहवाल?
गेल्या वर्षी जूनमध्ये वॉल स्ट्रीट जर्नलने एका रिपोर्टमध्ये दावा केला होता की, गौतम अदानी आपल्यावर असलेले लाचखोरीचे आरोप हटवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, अदानी समूहाच्या मालकीच्या 'मुंद्रा पोर्ट'द्वारे इराणमधून लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस आयात करून अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केले आहे का, याचीही चौकशी सुरू असल्याचे अहवालात म्हटले होते. अदानी समूहाने त्यावेळी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
अदानी एंटरप्राइजेजने दिलेले स्पष्टीकरण
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये अदानी एंटरप्राइजेजने मान्य केले की, ४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या 'ऑफिस ऑफ फॉरेन असेट्स'कडून माहिती देण्याबाबत विनंती प्राप्त झाली होती. कंपनी या प्रकरणावर अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत सातत्याने संवाद साधत असून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जात आहेत. "आमच्याकडून कोणताही गैरव्यवहार किंवा नियमांचे उल्लंघन झालेले नाही," असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
वाचा - श्रीमंत व्हायचंय? मग मध्यमवर्गीयांनी 'या' ५ चुका टाळा! गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांचा मोलाचा सल्ला
गुंतवणूकदारांना फटका
या नवीन घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अदानी एंटरप्राइजेजचा शेअर ९ फेब्रुवारीला १८००.१० रुपयांवर बंद झाला होता, जो आज सत्रादरम्यान १,७१० रुपयांपर्यंत खाली आला. बातमी लिहिताना हा शेअर सुमारे २ टक्क्यांच्या घसरणीसह १,६६५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. इतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्येही ४ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली.
